स्वतःला व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष समजून वावरल्याचा आरोप; प्रश्नांची सरबत्ती होताच घेतली माघार...
“वयाच्या मानाने असे होते, समजून घ्या...” म्हणत सेवानिवृत्त शिक्षकांनी काढता पाय घेतल्याची चर्चा
मंगळवेढा/प्रतिनिधी
एका शैक्षणिक संस्थेच्या पालक बैठकीत एका सेवानिवृत्त शिक्षकांच्या कथित हस्तक्षेपामुळे काही काळ वातावरण तापल्याची चर्चा आहे. स्वतःला शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष समजून बैठकीतील चर्चेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही उपस्थित पालकांनी केला. मात्र, पालकांनीच ठामपणे प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधितांचा कथित ‘डाव’ फसल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, परवा संबंधित संस्थेत पालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान एका सेवानिवृत्त शिक्षकांनी संस्थेच्या कामकाजासंदर्भात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकाराबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट नसतानाही आपणच समितीचे अध्यक्ष असल्याच्या थाटात वावरल्याचा आरोप काही पालकांकडून करण्यात आला.सुरुवातीला शांतपणे सुरू असलेल्या बैठकीत संबंधित व्यक्तीच्या हस्तक्षेपावर काही पालकांनी आक्षेप घेतला.आपली अधिकृत भूमिका काय? बैठकीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणी दिला? अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित झाल्याचे सांगण्यात येते.
पाठखळ येथील सामाजिक कार्यात आपणच सर्वांत अग्रेसर असल्याचा दावा करणाऱ्या एका बडेजाव व्यक्तीच्या वर्तनाची चर्चा सध्या गावात रंगली आहे. समाजकार्यात “मीच सगळे करतो” असा आव आणत मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या या व्यक्तीसमोर निवृत्त शिक्षक सरांनीही आपला रुबाब काही कमी नसल्याचे दाखवून दिले. मात्र, खूपसंगी येथील शाळेत घडलेल्या एका प्रसंगानंतर परिस्थितीने अचानक वेगळे वळण घेतले आणि बडेजाव मिरवणाऱ्या सरांनाच तेथून काढता पाय घ्यावा लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे समाजसेवेचा गवगवा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती आणि संयम महत्त्वाचा, असा संदेश या घटनेतून मिळत असल्याची गावकऱ्यांत उपरोधिक चर्चा आहे.तसेच पालकांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर परिस्थिती बदलली. स्वतःची बाजू मांडताना संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांनी वयाच्या मानाने असे होते, समजून घ्या, अशा आशयाचे वक्तव्य केल्याची चर्चा आहे. त्यानंतर त्यांनी तेथून माघार घेतल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात येत आहे.
चाणक्यनीती की ‘डाव’ उलटा? स्वतःच्या बुद्धीचातुर्यावर मोठा विश्वास असल्याची प्रतिमा निर्माण करणाऱ्या या सेवानिवृत्त शिक्षकांचा बैठकीतील कथित हस्तक्षेप मात्र पालकांच्या ठाम भूमिकेमुळे अपेक्षेप्रमाणे पुढे जाऊ शकला नाही, अशी चर्चा आता पालकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे “चाणक्य बुद्धीचा दावा, पण पालकांसमोर डाव फसला!अशी उपरोधिक चर्चा परिसरात रंगली आहे.पालकांनी दाखवली योग्य भूमिका शैक्षणिक संस्थेच्या कामकाजात पालक, शिक्षक, व्यवस्थापन आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या भूमिका नियमांनुसार निश्चित असतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने आपली अधिकृत जबाबदारी आणि अधिकार यांची मर्यादा लक्षात घेऊनच बैठकीत भूमिका मांडणे अपेक्षित आहे. पालकांनी याच भूमिकेतून आक्षेप घेतल्याने अखेर परिस्थिती नियंत्रणात आली, असे सांगण्यात येते.संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांनी बैठकीतून माघार घेतल्यानंतर काही काळ निर्माण झालेला तणाव कमी झाला आणि पालक बैठक पुन्हा सुरळीत झाली. त्यामुळे घोळ घालण्याचा प्रयत्न झाला, पालकांनी प्रश्न विचारले आणि वातावरण पुन्हा शांत झाले,अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, या घटनेबाबत संबंधित संस्थेचे व्यवस्थापन अथवा संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांची अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. संबंधितांची बाजू प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

