मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा पंढरपूर मुख्य मार्गावर आज सकाळी एसटी बस आणि पिकअप वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सहा शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. अपघाताची तीव्रता इतकी जबर होती की दोन्ही वाहनांचे पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाले.
माहितीनुसार, एसटीतील सहा विद्यार्थ्यां जखमी झाले असून पिकअप वाहन समोरून येणाऱ्या एसटी बसशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर रस्त्यावर काचांचे तुकडे, वाहनांचे सुटे भाग विखुरलेले दिसत होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.
या अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना किरकोळ तर काहींना मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एसटी बसमधील प्रवाशांनाही किरकोळ मार लागल्याचे समजते.
अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली तसेच कोणत्या कारणामुळे अपघात झाला याबाबत तपास सुरू आहे
