आंधळगावच्या योगेश खेर यांच्या मनमानी कारभाराच्या तक्रारींनी बैठक गाजली; तातडीने निलंबनाची कारवाई करण्याच्या आमदार समाधान आवताडे यांच्या सूचना....
मंगळवेढा/प्रतिनिधी
महावितरणच्या आंधळगाव शाखेतील शाखा अभियंता योगेश खेर यांच्या कथित मनमानी व अरेरावीच्या कार्यपद्धतीविरोधात शेतकरी आणि ग्राहकांच्या तक्रारींचा पाढा शनिवारी पाटकळ येथे झालेल्या बैठकीत वाचण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत अधीक्षक अभियंता संजीव माने यांच्याशी थेट संपर्क साधला. खेर यांच्याविरोधात तातडीने निलंबनाची कारवाई करून बदली करण्याच्या सूचना आ.आवताडे यांनी दिल्याने महावितरणच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
स्वराज्य ग्राम अभियानांतर्गत पाटखळ येथे आमदार समाधान आवताडे यांनी एक दिवस मुक्काम करत अधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत समस्या जाणून घेतल्या. यावेळी विविध विभागांशी संबंधित अनेक प्रश्न जागेवरच सोडविण्यात आले तर काही गंभीर प्रश्नांवर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.या बैठकीत शैलेवाडी येथील नानासाहेब चव्हाण यांच्यासह उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी आंधळगाव महावितरण शाखेतील शाखा अभियंता योगेश खेर यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदविले. खेर यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून शेतकरी व ग्राहकांच्या तक्रारी असूनही वरिष्ठ कार्यालयाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.फोन केला तरी उचलत नाहीत, कामासाठी हेलपाटे मारावे लागतात.
नानासाहेब चव्हाण यांनी बैठकीत खेर यांच्या कारभाराबाबत आक्रमक भूमिका मांडली. अनेकदा फोन करूनही प्रतिसाद मिळत नाही, फोन उचलला तरी नागरिकांशी अरेरावीच्या भाषेत बोलले जाते, कामे वेळेवर केली जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला. आंधळगाव शाखा कार्यालयात अनेक वेळा अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना मंगळवेढा येथे हेलपाटे मारावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील तसेच शेतीसाठीच्या वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत असतानाही त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांना समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने संताप वाढत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
आमदार आवताडे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित कार्यकारी अभियंता मधुकर साळवे व उपकार्यकारी अभियंता संतोष मरळी यांच्याकडे महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना चांगली सेवा मिळाली पाहिजे.मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.यानंतर आमदार आवताडे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता संजीव माने यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत योगेश खेर यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. खेर यांच्याविरोधात तातडीने निलंबनाची कारवाई करून बदली करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावर अधीक्षक अभियंता माने यांनी संबंधित प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.आमदारांसमोरच महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांनी थेट तक्रारी मांडल्याने आंधळगाव शाखेच्या कारभाराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आता वरिष्ठ अधिकारी या तक्रारींची काय दखल घेतात आणि शाखा अभियंता योगेश खेर यांच्यावर प्रत्यक्षात कोणती कारवाई होते.याकडे शेतकरी व ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
