दिव्य न्यूज नेटवर्क
पाटखळ येथे झालेल्या प्रचार सभेत आज राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले. दीर्घकाळ वेगवेगळ्या वाटांवर चालणारे दोन स्थानिक गट एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले आणि सभास्थळी अक्षरशः शक्तीप्रदर्शन झाले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. या वेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी थेट शब्दांत इशारा देत विकासाचा ठाम अजेंडा पुढे केला.
राजकारण बाजूला ठेवा आता गाव उभं करण्याची वेळ आहे.पाटखळचा विकास थांबणार नाही. लागेल तेवढा निधी आणू, पण कामे पूर्ण करू असे दमदार वक्तव्य आवताडे यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. रस्ते,पाणीपुरवठा, गटारी, शैक्षणिक सुविधा आणि तरुणांसाठी संधी या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. केवळ आश्वासने नाहीत तर प्रत्यक्ष कामे दिसली पाहिजेत, असा ठाम संदेश त्यांनी प्रशासनालाही दिला.
सभेत दोन्ही गटातील प्रमुख पदाधिकारी एकत्र बसल्याने गावातील राजकीय कटुता कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. “गाव प्रथम, मतभेद नंतर” हा नारा देत कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली. स्थानिक नागरिकांमध्येही या एकत्रीकरणामुळे विकासाच्या कामांना वेग येईल अशी चर्चा रंगली.
पाटखळच्या राजकारणात आजची सभा ही फक्त प्रचार नव्हती, तर ताकद, एकता आणि विकासाचा रोडमॅप दाखवणारा राजकीय संदेश ठरला आहे. आता घोषणांनंतर कृती कितपत दिसते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.


