मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा शहराजवळ भीषण अपघात होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एका लहान मुलासह अनेक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवेढा–पंढरपूर रस्त्यावरील देगाव येथे हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पोचा चालक दारूच्या नशेत वाहन चालवत होता. त्याच्या निष्काळजीपणामुळे हा भीषण अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ. शिवपुजे तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी संबंधित चालकावर कालच दारू पिऊन शहरातून अवजड वाहन चालवल्याबद्दल कारवाई केली होती. मात्र २४ तासांच्या आत पुन्हा दारूचे सेवन करून वाहन चालवल्याने हा दुर्दैवी अपघात घडला, ज्यात चौघांना आपला जीव गमवावा लागला.
जखमींमध्ये एका लहान बालकाचा समावेश असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. अपघातातील काही कुटुंबीय पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आले होते, अशी माहितीही समोर आली आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
