मंगळवेढा/प्रतिनिधी
श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत येणे रकमेसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या देणीबाबत अद्याप ठोस तोडगा निघाला नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी वाढत आहे. दरम्यान, आज बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळपासून सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल होऊन कारखान्याचे गेट बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काच्या थकीत रकमेसाठी कारखाना गेटवर धरणे आंदोलन सुरू केले आहे. चौथा दिवस संपला तरीही व्यवस्थापनाकडून ठोस आर्थिक तोडगा अथवा देणी देण्याबाबत निश्चित आश्वासन मिळाले नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलन करण्याची भूमिका ही केवळ दबाव निर्माण करण्यासाठी नसून, दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या हक्काच्या रकमेकडे व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी नाईलाजास्तव घेतल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
व्हाईस चेअरमनांकडून आंदोलकांची भेट...
दरम्यान,आंदोलनस्थळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.श्री.तानाजी भाऊ खरात यांनी भेट देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्यथा व मागण्या जाणून घेतल्या.यावेळी त्यांनी आंदोलकांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगून संचालक मंडळाशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
मात्र आंदोलकांना केवळ आश्वासन नको असून थकीत रकमेसंदर्भात ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष कार्यवाहीची अपेक्षा आहे. त्यामुळे आजच्या गेट बंद आंदोलनाकडे कारखाना प्रशासन तसेच सभासदांचे लक्ष लागले आहे.सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना न्याय मिळावा अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत देणे हा आता केवळ कर्मचाऱ्यांचा प्रश्न न राहता कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळासमोरचा महत्त्वाचा विषय बनला आहे. एका बाजूला आर्थिक अडचणी आणि कारखान्याचे कामकाज सुरळीत ठेवण्याचे आव्हान असताना दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे आपल्या हक्काच्या पैशाच्या प्रतीक्षेत असलेले सेवानिवृत्त कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.
आज गेट बंद आंदोलन झाल्यास कारखान्याच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि आंदोलक यांच्यात तातडीने चर्चा होऊन मध्यममार्ग काढला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही तासांत होणारी चर्चा आणि त्यातून निघणारा निर्णय आंदोलनाची दिशा ठरविणारा ठरणार आहे.
