दिव्य न्यूज नेटवर्क
श्री.संत बाळूमामा देवस्थान हजारेवाडी वाढेगाव येथे आज दि.२८ ऑगस्ट २०२६ रोजी श्री.बाळूमामा भंडारा उत्सव व पालखी मिरवणूक सोहळ्याचे तिसरे वर्ष उत्साहात साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत धनगरी ओव्या व गजीढोलाचा कार्यक्रम होणार असून, दुपारी ३ वाजता श्री बाळूमामांच्या पालखी मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. हजारेवाडी नं. ३ येथून सुरू होणारी पालखी मिरवणूक वाढेगावपर्यंत काढण्यात येणार आहे.
या भव्य धार्मिक सोहळ्यास परिसरातील तसेच जिल्ह्यातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री बाळूमामांचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजल्यापासून भाविकांच्या आगमनापर्यंत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, रात्री ९ वाजता महाआरती होणार आहे. श्री.बाळूमामांच्या भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडणार आहे. महाप्रसादाचे अन्नदाता रामभाऊ ज्ञानू कोळेकर, दुधेभावी असून, श्री संत बाळूमामा मंदिर समिती, हजारेवाडी, वाढेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर यांच्या वतीने सर्व भाविकांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

