मंगळवेढ्यातून सुरू झालेली धनश्रीची दोन राज्यांत गरुडभरारी, १५ वर्षांत १,५०१ कोटींच्या ठेवी... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, August 18, 2026

मंगळवेढ्यातून सुरू झालेली धनश्रीची दोन राज्यांत गरुडभरारी, १५ वर्षांत १,५०१ कोटींच्या ठेवी...


दिव्य न्यूज नेटवर्क

              मंगळवेढ्याच्या मातीतून सुरू झालेल्या धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने अवघ्या १५ वर्षांत महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत आपल्या कार्याचा विस्तार करत १,५०१ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या संस्थेने आज ३५ शाखांचे भक्कम जाळे उभारून सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

            धनश्रीच्या या यशामागे केवळ आर्थिक व्यवहार नसून ठेवीदार, सभासद आणि ग्राहकांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास हीच या वाटचालीची खरी ताकद असल्याचे संस्थेचे चेअरमन प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी सांगितले.ग्राहकांच्या गरजा ओळखून आर्थिक सेवा देणे, व्यवहारात पारदर्शकता ठेवणे, आर्थिक शिस्तीला प्राधान्य देणे आणि ग्राहकांशी विश्वासाचे नाते निर्माण करणे, या धोरणामुळे धनश्रीला अल्पावधीत मोठा विस्तार करता आला. मंगळवेढ्यातून सुरू झालेल्या संस्थेने ग्रामीण भागातील ग्राहकांपासून ते विविध व्यवसायिक व उद्योजकांपर्यंत आर्थिक सेवा पोहोचविण्याचे काम केले आहे.


            आज महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३५ शाखांच्या माध्यमातून संस्थेचा कारभार सुरू असून, १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा हा धनश्रीच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक मानला जात आहे. संस्थेच्या विस्तारामुळे सहकार क्षेत्रात मंगळवेढ्याचे नावही राज्याच्या पातळीवर अधोरेखित झाले आहे.या यशात संस्थेचे चेअरमन प्रा. शिवाजीराव काळुंगे, संचालक प्रा. शोभाताई काळुंगे, व्हाईस चेअरमन युवराज गडदे, संचालिका डॉ. राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सरव्यवस्थापक रमेश फडतरे, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळे संस्थेच्या विस्ताराला गती मिळाली.   पंधरा वर्षांच्या या यशस्वी वाटचालीनंतर भविष्यात आणखी आधुनिक, गतिमान आणि ग्राहकाभिमुख आर्थिक सेवा उपलब्ध करून देत संस्थेचा विस्तार करण्याचा धनश्रीचा मानस आहे. १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा गाठताना संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व ठेवीदार, सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Pages