हजारोंच्या साक्षीने शहीद वैभव आवताडे यांना अखेरचा निरोप , भारतमातेचा वीर सुपुत्र अनंतात विलीन... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, August 16, 2026

हजारोंच्या साक्षीने शहीद वैभव आवताडे यांना अखेरचा निरोप , भारतमातेचा वीर सुपुत्र अनंतात विलीन...


मंगळवेढा/प्रतिनिधी

              जम्मू येथे भारतीय लष्करात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना गणेशवाडी ता. मंगळवेढा येथील जवान वैभव तात्यासाहेब आवताडे वय ३१ यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी  गणेशवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक, राजकीय पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांनी साश्रू नयनांनी या भारतमातेच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला.अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत सुमारे ११ वर्षांपूर्वी वैभव आवताडे भारतीय सैन्यात दाखल झाले. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपल्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. जम्मू येथील प्रतिकूल परिस्थितीत सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. 




त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती शुक्रवारी दुपारी कुटुंबीयांना मिळाल्यानंतर गणेशवाडीसह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली.तसेच वैभव आवताडे काही दिवसांपूर्वी सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते.१३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता त्यांनी पत्नी, आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. कुटुंबीयांची विचारपूस करणारा हा नेहमीसारखा संवाद त्यांचा शेवटचा ठरेल, याची कल्पनाही कोणाला नव्हती. नियतीच्या या आघाताने आवताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.शहीद वैभव यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी दिपाली आणि तीन वर्षांची मुलगी देवांशी व एक वर्षाचा मुलगा देवांश असा परिवार आहे. अवघ्या सहा वर्षांपूर्वी विवाह झालेल्या वैभव यांच्या अकाली निधनामुळे दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरील पितृछत्र कायमचे हरपले आहे.

              दामाजी चौकात हजारोंनी केले अभिवादन शहीद वैभव यांचे पार्थिव विशेष विमानाने पुणे येथे आणल्यानंतर लष्करी वाहनातून मंगळवेढ्यात आणण्यात आले. दामाजी चौकात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करीत वीर जवानाला अभिवादन केले. त्यानंतर पार्थिव गणेशवाडी येथील आवताडे निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.गावातील चौकाचौकांतून शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘शहीद जवान अमर रहे’ अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

उपस्थित मान्यवर...

             अंत्यविधीप्रसंगी माजी मंत्री डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, खासदार प्रणिती शिंदे, आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, युवक नेते प्रणव परिचारक, तहसीलदार मदन जाधव, सभापती दिपाली ताड, जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पंचायत समिती सदस्य विनायकराव यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नागणे, माजी संचालक सुरेश भाकरे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. दत्तात्रय खडतरे यांच्यासह आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages