दिव्य न्युज नेटवर्क
मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि "पांडुरंग विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल!" अशा जयघोषात गावातून भक्तिमय दिंडी काढली. शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी गावातील श्री विठ्ठल-पांडुरंग मंदिरात पोहोचली.
यावेळी भजनी मंडळाने अभंग आणि हरिनामाचा गजर करत वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. विद्यार्थ्यांनी संत परंपरेचा वारसा जपत वारकरी संस्कृतीचा सुंदर संदेश दिला.या बाल दिंडी सोहळ्यास गावातील पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

