शेतकरी-पशुपालकांना तातडीने दिलासा द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना नेते अनिल सावंत यांचे निवेदन.... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, July 19, 2026

शेतकरी-पशुपालकांना तातडीने दिलासा द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना नेते अनिल सावंत यांचे निवेदन....

मंगळवेढा/प्रतिनिधी

                  आषाढी वारी सोहळ्यानिमित्त राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब पाहणीसाठी आले असता मंगळवेढा तालुक्यात यंदा अत्यल्प पावसामुळे गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून चारा, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा आणि रोजगार हमीच्या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे शिवसेना नेते अनिल सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात खरीप पेरणी केवळ ११ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली असून सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी धोक्यात आली आहे. दमदार पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त असून शेतीसह पशुधनावरही संकट ओढावले आहे.तालुक्यात सुमारे ९४ हजारांहून अधिक पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नदीकाठच्या उसाचा चारा म्हणून वापर केला जात असून त्यासाठी सुमारे चार हजार रुपये प्रति टन खर्च करावा लागत आहे. त्यामुळे दूध व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वैरणीवर खर्च होत असून पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

         


    

           तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अपूर्ण अथवा निकृष्ट दर्जाची असल्याने नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून सर्व गावांना पाणी मिळत नसून, आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही अनेक गावांना अद्याप पाणी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे गावनिहाय पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.भीमा नदीकाठच्या शेतीसाठी नियमित वीजपुरवठा होत नसल्याने उभी पिके करपत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत दक्षिण भागातील गावांना पुरेशा दाबाने व आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नसल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागातील सर्व साठवण तलाव तातडीने भरून शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

                   रोजगाराचा प्रश्नही गंभीर बनला असून ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने शासनाच्या १२५ दिवस रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या योजनेअंतर्गत तातडीने सार्वजनिक विकासकामे सुरू करावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.दरम्यान, तालुका दुष्काळग्रस्त घोषित करणे, चारा छावण्या व चारा डेपो सुरू करणे, टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करणे, जलजीवन मिशन व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतील त्रुटी दूर करणे, शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करणे, म्हैसाळ योजनेचे पाणी पुरेशा दाबाने उपलब्ध करून देणे, रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक कामे तातडीने सुरू करणे तसेच शेतकरी व पशुपालकांना आवश्यक आर्थिक आणि प्रशासकीय मदत देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी मंगळवेढा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फरभाई काझी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष रंदवे, सिताराम भगरे, संजय लेंडवे, सुनील चेळेकर उपस्थित होते.

मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिक गंभीर संकटाचा सामना करत असल्याने शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी अपेक्षा अनिल सावंत यांनी व्यक्त केली.









         


Pages