दिव्य न्यूज नेटवर्क..
राज्यातील भाजप सरकारने अर्थसंकल्पातून विविध घोषणांचा पाऊस पाडला असला, तरी प्रत्यक्षात जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आजही वाऱ्यावर असल्याची टीका करत शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मंगळवेढा येथे येत्या ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता दामाजी चौक ते प्रांत कार्यालयावर भव्य सर्वपक्षीय धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली.
राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडते; मात्र अंमलबजावणीच्या वेळी निधी नसल्याचे कारण सांगून हात वर करते, ही भाजप सरकारची जुनीच पद्धत असल्याची टीका त्यांनी केली. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आत्मसन्मानासाठी लढत असताना सरकार केवळ इव्हेंटबाजी करण्यात मग्न आहे, अशी भावना शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.सरकार एका बाजूला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देते; मात्र शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी ‘निधी नाही’ असे सांगितले जाते, हा मोठा विरोधाभास असून या प्रश्नाचा जाब सरकारला विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या सरकारला जमिनीवरील वास्तव दाखवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेते व सर्वसामान्य नागरिक एकत्र आले असल्याचेही ढोबळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ शब्दांचा खेळ असून निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. उलट शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य सरकार करत असल्याची भावना शेतकरी वर्गात निर्माण झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मोर्चातील प्रमुख मागण्या.....
१) जाहीरनाम्यात दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून ७/१२ कोरा करावा.२) शेतकऱ्यांच्या विजपंपांची सर्व थकीत बिले माफ करून वीज पुरवठ्याचा कालावधी वाढवावा.३) २०२४ व २०२५ च्या खरीप-रब्बी हंगामातील पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा.४) तूर, मका व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत.५) घरकुल योजनेसाठी ५ ब्रास वाळू संपूर्ण तालुक्यातील लाभार्थ्यांना मिळावी व भूमिहीनांना जागा उपलब्ध करून द्यावी.६) बीडीओ कार्यालयातील प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी.७) जलजीवन योजना, वीज प्रश्न आणि चारा छावणी यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा.
दामाजी पंतांच्या पावन भूमीत अन्यायाविरुद्ध क्रांतीची ठिणगी पडली असून हा मोर्चा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य जनतेचा असल्याचेही नेत्यांनी सांगितले. शासनाने मागण्यांची दखल घेईपर्यंत शांत बसणार नाही, असा निर्धार व्यक्त करत मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले आहे.
