दिव्य न्यूज नेटवर्क
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील पाटखळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विविध कला गुणदर्शन व वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला. अनेक वर्षांनंतर शाळेत असा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा परिषद सदस्य करूणा शिवशरण,जिल्हा परिषद सदस्य प्रदिप खाडेकर, पंचायत समिती सदस्या दिपाली ताड,पंचायत समिती सदस्य विनायकराव यादव पाटखळ ग्रामपंचायतीचे सरपंच ऋतुराज बिले-पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल लुगडे,उपाध्यक्ष जोतीताई हेंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. धार्मिक व सांस्कृतिक नाटिका, मराठमोळ्या लावणी, नृत्य, गीत, देशभक्तीपर सादरीकरणे अशा विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. लहान मुलांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित पालक आणि ग्रामस्थ भारावून गेले होते.
या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कला आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. तसेच विद्यार्थ्यांकडून एवढे सुंदर सादरीकरण करून घेण्यासाठी शिक्षकांनी घेतलेले परिश्रम व त्यांचे मार्गदर्शन याचेही विशेष कौतुक करण्यात आले.पालकांनीही आपल्या मुलांचे विविध कार्यक्रम पाहून आनंद व्यक्त केला. अनेक वर्षांनंतर शाळेत असे रंगतदार स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समिती यांनी विशेष परिश्रम घेतले.
