दिव्य न्युज नेटवर्क
पंचायत समिती मंगळवेढा यांच्या वतीने आंधळगाव व मारापूर येथील घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळूचे वितरण करण्यात आले. शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घर बांधणाऱ्या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास कर्तव्यदक्ष डीवायएसपी श्री.शिवपुजे साहेब, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीड्डे, तहसीलदार श्री.जाधव साहेब तसेच पंचायत समितीच्या सभापती सौ.दीपालीताई ताड मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना मोफत वाळूचे वाटप करण्यात आले.
घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेल्या वाळूचा खर्च अनेक लाभार्थ्यांना परवडत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन पंचायत समितीच्या माध्यमातून मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम लवकर पूर्ण करण्यास मदत होणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. घरकुल लाभार्थ्यांनी या सुविधेचा योग्य लाभ घेऊन आपले घरकुल बांधकाम वेळेत पूर्ण करावे, असे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ, घरकुल लाभार्थी तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोफत वाळू वाटपामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
