राजकीय रिंगणात टक्कर, मतदान केंद्रावर हसत संवाद लोकशाहीतील परिपक्वतेचा क्षण... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, February 8, 2026

राजकीय रिंगणात टक्कर, मतदान केंद्रावर हसत संवाद लोकशाहीतील परिपक्वतेचा क्षण...


मंगळवेढा/प्रतिनिधी

         जिल्हा परिषद भोसे गटात निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांविरुद्ध जोरदार प्रचार, आरोप-प्रत्यारोप, शक्तीप्रदर्शन आणि कार्यकर्त्यांची लगबग असे चित्र काही दिवसांपासून पाहायला मिळत होते. दोन वेगवेगळ्या पक्षांतील बलाढ्य नेते समोरासमोर उभे ठाकल्याने ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती. राजकीय रंगमंचावर दंड थोपटून मैदानात उतरलेले हे नेते मतदानाच्या दिवशी मात्र मतदान केंद्र परिसरात निवांत गप्पा मारताना दिसले आणि तोच हा वेगळा, बोलका क्षण.या दृश्यात राजकारणातील कटुता नसून लोकशाही संस्कृतीची जाणीव दिसते.

       


   

        निवडणूक म्हणजे विचारांची लढाई असतेवैयक्तिक वैर नव्हे हा संदेश अशा प्रसंगातून जनतेपर्यंत पोहोचतो.मतदारांसाठीही हा सकारात्मक संकेत ठरतो की,वरच्या पातळीवर नेते एकमेकांशी संवाद ठेवत असतील तर गावपातळीवर तणाव वाढण्याची गरज नाही.मतदान केंद्र हे वादाचे नव्हे तर संविधानिक हक्क बजावण्याचे पवित्र ठिकाण असते. तिथे उमेदवार किंवा नेते शांतपणे संवाद साधताना दिसणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेबद्दलचा आदर दर्शवणारी बाब आहे. निवडणुकीत स्पर्धा असली तरी समाजातील सलोखा टिकवणे हीही नेतृत्वाची जबाबदारी असते.

          ग्रामीण भागात निवडणुकीदरम्यान वातावरण तापलेले असते. कार्यकर्त्यांमध्ये ताण चर्चा अंदाज यांची रेलचेल असते.अशा वेळी प्रतिस्पर्धी नेते एकमेकांशी हसत बोलताना दिसणे म्हणजे राजकारण वेगळे नातेसंबंध वेगळे ही भावना अधोरेखित करणारे चित्र ठरते.एकूणच हा क्षण फक्त दोन व्यक्तींच्या गप्पांचा नाही, तर परिपक्व लोकशाहीचा आरसा आहे जिथे लढत मतांची असते, मनांची नाही.

Pages