दिपाली ताड यांचा दमदार विजय; शेतकरी, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याचा निर्धार... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, February 9, 2026

दिपाली ताड यांचा दमदार विजय; शेतकरी, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याचा निर्धार...

मंगळवेढा/प्रतिनिधी


           संत चोखामेळानगर गणातून भाजपच्या उमेदवार दिपाली ताड यांनी 5625 मतांच्या भक्कम आघाडीसह विजय मिळवत आपली लोकप्रियता आणि जनाधार सिद्ध केला. या विजयामुळे परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मतदारांनी विकासाला दिलेला कौल स्पष्ट झाला आहे.
              विजयानंतर माध्यमांशी बोलताना दिपाली ताड यांनी सर्व मतदारांचे आभार मानत, हा विजय जनतेचा असल्याचे सांगितले. “मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवेन. येणाऱ्या काळात शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत क्षेत्रांवर विशेष भर देणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


            त्या पुढे म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शेतीपूरक योजनांचा पाठपुरावा केला जाईल. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, शाळांची पायाभूत सुधारणा आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी दवाखान्यांची सुविधा, औषध उपलब्धता आणि आरोग्य शिबिरे यासाठी प्रयत्न करण्यात येतील.


           दिपाली ताड यांच्या या विजयामुळे संत चोखामेळानगर गणात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला, तर कार्यकर्त्यांनी पुढील पाच वर्षे विकासाची नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

Pages