दिव्य न्यूज नेटवर्क
लोकशाही ही केवळ व्यवस्था नसून ती प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून जिवंत राहणारी ताकद आहे, याचा जिवंत आदर्श आज मरवडे मतदान केंद्रावर पाहायला मिळाला. तब्बल 112 वर्ष पूर्ण केलेल्या आजोबांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत मतदानाचा हक्क बजावला आणि उपस्थित सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरले.
वयोमानामुळे चालण्यात अडचणी असतानाही कुटुंबीयांच्या मदतीने ते मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि डोळ्यांतील समाधान स्पष्ट सांगत होते की, “लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते.” मतदान केल्यानंतर त्यांचा छायाचित्र क्षण टिपण्यात आला, जो पाहून तरुण मतदारांनाही उत्साहाची नवी ऊर्जा मिळाली.
आजोबांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतचा देशाचा प्रवास अनुभवला आहे.अशा ज्येष्ठ नागरिकाने मतदान करणे म्हणजे लोकशाहीवरील निष्ठेचा जिवंत पुरावा आहे.आरोग्य साथ देत असेल तोपर्यंत मतदान करणार अशी त्यांची साधी पण प्रभावी प्रतिक्रिया उपस्थितांनाही भावून गेली.
मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही त्यांचे विशेष स्वागत केले. अनेकांनी त्यांच्यासोबत छायाचित्र काढत या क्षणाला ऐतिहासिक ठरवले लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येक मत महत्त्वाचे आणि 112 वर्षांच्या आजोबांनी ते कृतीतून दाखवून दिले.
