अंतिम टप्प्यात प्रचार थंडावला,आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं; ‘लक्ष्मी दर्शन’ ठरणार निर्णायक.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, February 6, 2026

अंतिम टप्प्यात प्रचार थंडावला,आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं; ‘लक्ष्मी दर्शन’ ठरणार निर्णायक....


मंगळवेढा/प्रतिनिधी

            जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपल्या असून सुरुवातीच्या सुसाट प्रचारानंतर सध्या मैदानात वेगळंच चित्र दिसत आहे. मोठ्या जाहीर सभा, ढोल-ताशे, शक्तिप्रदर्शन यांची गर्दी ओसरली असली तरी पडद्यामागील राजकीय हालचाली मात्र अधिक वेगाने सुरू आहेत. उघड प्रचार थंडावला असला तरी गावागावात गाठीभेटी, घरपोच संपर्क आणि गुप्त रणनीती यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

           या टप्प्यात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा आरोप-प्रत्यारोपांनीच जास्त रंग भरला आहे. एकमेकांवर अपयश, निधी गडप, कामे रखडवणे, मतदारांना भूलथापा देणे असे आरोप केले जात आहेत. सोशल मीडियावरूनही शाब्दिक वार सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये तणावाची परिस्थिती दिसून येते. मतदार मात्र शांतपणे सगळं पाहत आहेत; वरवर गप्प असले तरी मतदानाच्या दिवशी कोणाला साथ द्यायची याचा हिशोब प्रत्येकाने मनात पक्का केला आहे.



           या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील वैयक्तिक संपर्क, नातेसंबंध आणि आर्थिक ताकद हे घटक निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आहे. शेवटच्या टप्प्यातील “लक्ष्मी दर्शन” म्हणजेच मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी होणाऱ्या गुप्त हालचाली यावरही राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू आहे. त्यामुळे निकाल केवळ पक्षीय लाटेवर नाही तर शेवटच्या क्षणी कोण किती प्रभाव टाकतो यावर ठरण्याची शक्यता आहे.

                एकंदरीत प्रचाराची धामधूम कमी झाली असली तरी राजकीय तापमान मात्र शिगेला पोहोचले आहे. आता सर्वांचे लक्ष मतदानाच्या दिवसाकडे लागले असून, मतपेटीतूनच खरी ताकद कोणाची हे स्पष्ट होणार आहे. गावोगावी शांतता असली तरी आतून राजकीय समीकरणे जोरात हलत असल्याने ही निवडणूक चुरशीची आणि अनपेक्षित निकाल देणारी ठरणार, यात शंका नाही.

Pages