आमदार समाधान आवताडे यांचा सत्कार व ग्रामस्थांचे सभापतीपदासाठी साकडे.....
मंगळवेढा/प्रतिनिधी
संत चोखामेळा नगर गणातून निवडून आलेल्या दीपाली आनंद ताड यांना पंचायत समितीच्या सभापती पदाची संधी मिळावी, यासाठी गणातील सर्व गावांमधील नागरिकांनी एकत्र येत आमदार समाधान आवताडे यांच्याकडे साकडे घातले. या वेळी आमदार साहेबांचा सत्कार करून ग्रामस्थांनी आपली मागणी ठामपणे मांडली. संत चोखामेळा नगर गणातून सभापती पदासाठी पहिल्यांदाच अधिकृतपणे दीपाली ताड यांच्या नावाची मागणी करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास संत चोखामेळा नगर गणातील विविध गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने दीपाली आनंद ताड यांना सभापती पदासाठी पाठिंबा दर्शवला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दीपाली ताड यांनी निवडून आल्यापासून परिसरातील मूलभूत प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून विकासकामांसाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व महिलांशी संबंधित प्रश्न याबाबत त्यांनी पुढाकार घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे सभापती पदाची संधी मिळाल्यास संत चोखामेळा नगर गणासह संपूर्ण तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.या वेळी आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामस्थांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले.
लोकभावना लक्षात घेऊन योग्य वेळी सकारात्मक निर्णय घेण्याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिल्याचे उपस्थितांनी सांगितले.या मागणीमुळे संत चोखामेळा नगर गणात राजकीय हालचालींना वेग आला असून पंचायत समितीच्या सभापती निवडीत दीपाली आनंद ताड यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. सर्व गावांनी एकत्र येऊन केलेली ही पहिलीच एकमुखी मागणी असल्याने या घडामोडीकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
