राष्ट्रवादी काँग्रेसची संघटित मोर्चेबांधणी विरुद्ध भाजपची थंड प्रचारयंत्रणा मतदारांमध्ये संभ्रम.....
मंगळवेढा/प्रतिनिधी
लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार कोमल ढोबळे आणि भाजपच्या उमेदवार करुणा शिवशरण यांच्यात थेट लढत उभी राहिली आहे. मात्र मैदानातली हालचाल पाहता या लढतीचं पारडं सध्या एकतर्फी झुकत असल्याचं चित्र दिसत आहे.
कोमल ढोबळे यांनी प्रचाराची सुरुवात संघटित पद्धतीने करत गावागावात बैठका, महिला मेळावे, शेतकरी संवाद,स्थानिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाटप अशा पद्धतीने मजबूत नेटवर्क उभं केलं आहे.त्यांच्या प्रचारात स्थानिक पातळीवरील प्रश्न पाणीपुरवठा,रस्ते,शेतकऱ्यांचे प्रश्न,शाळा आरोग्य सुविधा यांवर थेट संवाद दिसतो. त्यामुळे त्यांचा प्रचार “जमिनीवरचा” असल्याची भावना मतदारांमध्ये तयार होत आहे.
याउलट भाजप उमेदवार करुणा शिवशरण यांचा प्रचार अपेक्षित वेगाने पुढे सरकत नसल्याची चर्चा गावपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रमुख पदाधिकारी दिसत नाहीत, बूथनिहाय नियोजन स्पष्ट नाही, आणि मतदारांशी थेट संपर्क कमी असल्याचं स्थानिक नागरिक सांगतात. “उमेदवार कुठे दिसत नाहीत?” हा प्रश्न काही गावांमध्ये उघडपणे विचारला जातोय.त्यामुळे शिवशरण यांचा प्रचार दिशाहीन झाल्याची भावना वाढताना दिसते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणूक फक्त पक्षाच्या नावावर जिंकता येत नाही; स्थानिक पातळीवर उमेदवाराची उपस्थिती, कार्यकर्त्यांची नाळ आणि सातत्यपूर्ण संपर्क महत्त्वाचा असतो. या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. भाजपकडे मतदारसंघात पक्षाचं मतदार बळ असलं तरी ते प्रत्यक्ष मतदानात रूपांतरित करण्यासाठी जोरदार हालचाल आवश्यक आहे.
या गटात शेवटच्या टप्प्यात प्रचारात अचानक वेग आला तर समीकरण बदलू शकतं; मात्र सध्याच्या परिस्थितीत कोमल ढोबळे यांचा प्रचार जोमात तर करुणा शिवशरण यांचा प्रचार गती पकडण्यात शांत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. आता पुढील काही दिवसांत भाजप यंत्रणा सक्रिय होते का,यावर या लढतीचा खरा रंग ठरणार आहे.

