4 लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.....
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा शहर हद्दीत मरवडे रोडकडे जाणार्या नकाते कॉम्पलेक्स समोर चालणार्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून जवळपास 4 लाख 57 हजार 680 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार जागेच्या मालकासह अजय नाईकवाडी,सचिन वाकडे,अजय जाधव, रामचंद्र आवताडे,अरुण डोके,अशरफ मुजावर,विनोद लोकरे,बाबा अवघडे,गणेश कोळी व जागा मालक महादेव सावंजी या सह दहा जणाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाल्याने जुगार खेळणार्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,मंगळवेढा शहर परिसरात मरवडे रोडवर तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयास प्राप्त होतास यातील फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे नेमणूक नियंत्रण कक्ष यांच्या पथकाने दि.23 जानेवारी रोजी सायंकाळी 4.10 वाजता सदर ठिकाणी छापा टाकला असता वरील दहा आरोपी जुगाराच्या अड्ड्यात समोरसमोर गोलाकार बसून बावन्न पानाच्या पत्याच्या तिरट नावाचा जुगात खेळत असताना मिळून आले. यामध्ये पोलीसांनी 9 मोबाईल,6 मोटर सायकली व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान पोलीस अधिक्षक कार्यालयास येथील अवैध धंद्याची माहिती मिळते,येथील स्थानिक पोलीसांना माहिती कशी काय होत नाही? याबाबत नागरिकामधून उलटसुलट चर्चा सुरु आहे. ही घटना शहर हद्दीमध्ये घडली असल्याने त्या पोलीस कर्मचार्याच्या कर्तव्यावर संशय व्यक्त नागरिकामधून केला जात आहे. पोलीस अधिक्षकांनी याची गंभीर दखल घेवून अवैध धंद्याला पाठीशी घालणार्या पोलीस कर्मचार्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शहरवासीयामधून जोमाने पुढे येत आहे. तत्कालीन पोलीस अधिक्षक विरेश प्रभू कार्यरत असताना ज्यांच्या हद्दीत अवैध धंदे आढळतील त्यांना जबाबदार धरुन संबंधीत बीट अंमलदारावरती कारवाई करत असे त्यामुळे अवैध धंदे समुळ हद्दपार झाले होते,हाच पॅटर्न विद्यमान पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी अंमलात आणल्यास अवैध धंदे हद्दपार होण्यास निश्चित मदत होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ही अबाधीत राहिल अशा प्रतिक्रीया जेष्ठ नागरिकामधून व्यक्त होत आहेत.
