दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दामाजी कारखान्याची ३० रुपयांची दरवाढ मागे घ्या, अन्यथा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन........ - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, November 4, 2026

दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दामाजी कारखान्याची ३० रुपयांची दरवाढ मागे घ्या, अन्यथा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन........


मंगळवेढा/प्रतिनिधी

                   मंगळवेढा तालुक्यासह परिसरातील शेतकरी यंदा भीषण दुष्काळाच्या संकटात सापडला असून पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे वैरणीच्या टंचाईमुळे पशुधन जगवायचे कसे खतांच्या वाढत्या किमती आणि शेतीचा वाढता खर्च भागवायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याऐवजी दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने साखरेचा दर २० रुपयांवरून थेट ३० रुपये केल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ऊसाला भाव देण्याची वेळ आली की कारखाना आर्थिक अडचणीत असल्याचे सांगितले जाते मग शेतकऱ्यांच्या गरजेच्या वेळी दरवाढीचा निर्णय कशासाठी? असा संतप्त सवाल आता ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत.मंगळवेढा तालुक्याचा माळभाग हा प्रामुख्याने दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी ऊस हेच वर्षभराच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे पाण्याची कमतरता उन्हाचा तडाखा आणि वाढता उत्पादन खर्च सहन करीत शेतकरी बारा महिने ऊसाचे पीक जगवतो. त्यासाठी खत औषधे मजुरी पाणी आणि वाहतुकीवर मोठा खर्च करावा लागतो. अनेक वेळा कर्ज काढून ऊस उभा केला जातो. मात्र ऊस कारखान्याला घालण्याची वेळ आली की दराबाबत कारखान्याची आर्थिक परिस्थिती पुढे केली जाते.एकीकडे शेतकऱ्यांच्या ऊसदराचा प्रश्न उपस्थित झाला की कारखान्याच्या आर्थिक अडचणींचा दाखला दिला जातो तर दुसरीकडे साखर खरेदीच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.



           दामाजी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनावर आणि त्यांच्या सहकार्यावर उभा असलेला सहकारी प्रकल्प आहे. त्यामुळे कारखान्याच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे मात्र दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी साखरेचा दर वाढविण्याचा निर्णय घेतल्याने चेअरमन व संचालक मंडळाच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.शेतकऱ्यांच्या कष्टातून कारखान्याला ऊस उपलब्ध होतो. मग शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांना दिलासा देण्याची जबाबदारी कारखाना प्रशासनाची नाही का?कारखान्याच्या सभासदांना आणि ऊस उत्पादकांना विश्वासात घेऊन दरवाढीचा निर्णय घेतला का? दरवाढीमागील नेमके आर्थिक कारण काय आहे? याबाबत कारखाना प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणीही होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दामाजी साखर कारखाना प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे की साखरेचा वाढविण्यात आलेला १० रुपयांचा दर तातडीने कमी करून पूर्वीप्रमाणे २० रुपये करण्यात यावा. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देऊन त्यांची दिवाळी गोड करावी.कारखान्याने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा.अन्यथा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दामाजी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.शेतकरी हा कारखान्याचा कणा आहे, त्यालाच आर्थिक संकटात ढकलून सहकार क्षेत्राचा विकास होणार कसा? दुष्काळाने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता तरी कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या घामाची आणि कष्टाची जाणीव ठेवून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Pages