बिघडविणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिसांची सज्जता,आयटीआयसमोरील प्रांगणात सराव....
मंगळवेढा/प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या वतीने ‘मॉब डिस्पर्सल’ (जमाव पांगविणे) रंगीत तालीम गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात आली. मंगळवेढा आयटीआय कॉलेजसमोरील प्रांगणात सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत ही रंगीत तालीम पार पडली.या रंगीत तालीमीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिवपूजे साहेब यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही कारणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांनी परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवून जमावाला शिस्तबद्ध पद्धतीने पांगविण्यासाठी आवश्यक ती कार्यपद्धती कशी राबवावी, याचा प्रत्यक्ष सराव यावेळी करण्यात आला.या रंगीत तालीमीमध्ये मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील ४ पोलीस अधिकारी व २२ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांमध्ये समन्वय, तत्परता आणि शिस्त राखण्यासाठी विविध बाबींचा सराव करून घेण्यात आला.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच कोणतीही अनुचित परिस्थिती उद्भवल्यास त्यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात येत आहे.गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिसांची तयारी पूर्ण असल्याचे या रंगीत तालीमीमधून स्पष्ट झाले.
