मंडळ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त; कार्यालयीन वेळेत अधिकारी गैरहजर असल्याच्या तक्रारी.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, September 1, 2026

मंडळ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त; कार्यालयीन वेळेत अधिकारी गैरहजर असल्याच्या तक्रारी....

 

दोन-अडीच तास ताटकळत बसण्याची वेळ; तहसीलदार मदन जाधव कारवाई करणार का?


मंगळवेढा/प्रतिनिधी


      ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शासकीय कामांना गती देण्यासाठी महसूल विभागाची कार्यालये असली, तरी पाटखळ मंडळ कार्यालयातील कथित मनमानी कारभारामुळे शेतकरी अक्षरशः वैतागले असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. “दाम असेल तरच काम” अशा पद्धतीने कामकाज चालत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून केला जात असून, या प्रकाराची वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे.पाटखळ मंडळ अधिकारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत नियमितपणे उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामीण भागातून कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना दोन-दोन, अडीच-अडीच तास कार्यालयात बसून अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. एखाद्या छोट्याशा महसूल कामासाठी संपूर्ण दिवस खर्ची पडत असल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

            विशेष म्हणजे, मंडळ अधिकाऱ्यांकडून तलाठ्यांवरही दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे महसूल विभागातील अंतर्गत कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “हम करो सो कायदा” या पद्धतीने कारभार सुरू असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.



दहा गावांचा कारभार; तरीही शेतकऱ्यांना अधिकारी भेटेनात!


               पाटखळ मंडळाच्या अखत्यारीत खुपसंगी, पाटखळ, मेटकरवाडी, गणेशवाडी, कचरेवाडी, डोंगरगाव, खोमनाळ, फटेवाडी, डोणज आणि भालेवाडी अशी तब्बल दहा गावे येतात. या गावांमधून विविध महसूल कामांसाठी शेतकरी पाटखळ मंडळ कार्यालयात येतात. मात्र अधिकारी वेळेत उपलब्ध नसल्यास त्यांना पुन्हा-पुन्हा हेलपाटे मारावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

तहसीलदार मदन जाधव कारवाई करणार का?

                कार्यालयीन वेळेत अधिकारी उपस्थित राहतात की नाही, शेतकऱ्यांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागते का, तसेच मंडळ कार्यालयातील कामकाजाबाबत होत असलेल्या तक्रारींची सत्यता काय आहे, याची मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव यांनी प्रत्यक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांना शासकीय कामांसाठी विनाकारण ताटकळत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून शिस्तभंगाची कारवाई होणार का? कार्यालयीन वेळेचे पालन न करणाऱ्यांना कोण जाब विचारणार? आणि ‘पैसा दिल्याशिवाय काम होत नाही’ या आरोपांची चौकशी महसूल प्रशासन करणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Pages