आगीने जाळलं… पण माणुसकीने वाचवलं! खुपसंगीच्या शेतकरी गटाचा प्रेरणादायी उपक्रम.. - Divyaprabhat News

Breaking News

Monday, May 11, 2026

आगीने जाळलं… पण माणुसकीने वाचवलं! खुपसंगीच्या शेतकरी गटाचा प्रेरणादायी उपक्रम..

मंगळवेढा/प्रतिनिधी

           मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी-आंधळगाव हद्दीतील वनिकरण क्षेत्रात अलीकडे लागलेल्या भीषण आगीत अनेक झाडे जळून नुकसान झाले. या झाडांचे पूर्णपणे अस्तित्व नष्ट होऊ नये आणि त्यांना नवजीवन मिळावे, या उद्देशाने पाणी फाउंडेशन फार्मर कप २०२६ मध्ये सहभागी झालेल्या श्री.कामसिद्ध शेडनेट शेती शेतकरी गट, खुपसंगी यांच्या वतीने स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

          सदर गटाने सुमारे १० हेक्टर क्षेत्रातील जळालेल्या झाडांना आळी करून टँकरच्या सहाय्याने पाणी देण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही आदेशाची वाट न पाहता, केवळ निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने परिसरातून या कार्याचे कौतुक होत आहे.आज आपण झाडांना पाणी घालतोय, उद्या हीच झाडे आपल्याला सावली, शुद्ध हवा आणि जीवन देणार आहेत. अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. आगीनंतर जळालेल्या झाडांना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न म्हणजे निसर्ग संवर्धनासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत नागरिकांनी मांडले.गटाच्या वतीने युवक व निसर्गप्रेमींना आवाहन करण्यात आले की जळलेल्या झाडांना जीवनदान या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे आणि आपल्या कृतीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश द्यावा.

 


          यावेळी खुपसंगीचे सरपंच कुशाबा पडवळे तसेच शेतकरी गटाचे अध्यक्ष दिनेश लेंगरे, सचिव विनोद बंडगर, निमंत्रक बापू शेळके, तसेच राजकुमार चौगुले, दत्ता शेजाळ, सुरेश लेंगरे, पांडु टकले, समाधान शेळके, विकास लवटे, अविनाश माळी, नवनाथ बंडगर, विजय शेळके, रामचंद्र तांबे आदी उपस्थित होते

Pages