सांगोला ग्रामीण रुग्णालयातील कथित भ्रष्टाचार प्रकरण; कारवाई न झाल्यास 12 मे रोजी रास्ता रोकोचा इशारा :- मा.नगरसेवक सतीश सावंत - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, May 3, 2026

सांगोला ग्रामीण रुग्णालयातील कथित भ्रष्टाचार प्रकरण; कारवाई न झाल्यास 12 मे रोजी रास्ता रोकोचा इशारा :- मा.नगरसेवक सतीश सावंत

 सांगोला/प्रतिनिधी

            सांगोला ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. रुग्णांना योग्य सेवा दिली जात नसून विविध कारणांनी पैसे उकळले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. विशेषतः मयत व्यक्तींच्या शवविच्छेदनासाठी 2,000 रुपये घेतल्याशिवाय मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शवविच्छेदनाचा अहवाल देण्यासाठी संबंधित डॉक्टरांकडून 5 ते 10 हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणात धीरज भोरे नावाच्या सफाई कामगाराची चौकशी करून त्यांच्यासह संबंधित डॉक्टरांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 12 मे 2026 रोजी सांगोला–पंढरपूर रोडवरील बिलेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.



              निवेदनानुसार, शवविच्छेदनानंतरही मृतदेह ताब्यात देण्यासाठी पैसे घेतले जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काही दिवसांनी अहवाल घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांकडून पुन्हा मोठ्या रकमेची मागणी होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे.याशिवाय, रुग्णालयात रात्री अपरात्री डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. सफाई कामगारांकडून शवविच्छेदनासारखी कामे करून घेतली जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच अ‍ॅम्ब्युलन्स सेवेतही कमिशन घेतले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा 12 मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Pages