दुष्काळाची राखरांगोळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक.. - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, October 3, 2026

दुष्काळाची राखरांगोळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक..


कागदावरचा पंचनामा नको बांधावरचा दुष्काळ पाहा...

मंगळवेढा/प्रतिनिधी                                                                                 

मंगळवेढा तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हाधिकारी एस. कार्तिकीकेयन यांनी आज गणेशवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे आणि शिरसी या दुष्काळी भागाचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.यावेळी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची झालेली वाताहत पावसाअभावी वाया गेलेला उत्पादन खर्च आणि पंचनाम्याच्या प्रक्रियेतील अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पेरणी कधी केली पिकाची सद्यस्थिती काय आहे आणि पावसामुळे नेमके किती नुकसान झाले याबाबत विचारणा केली.यावर शेतकऱ्यांनी सांगितले की खरीपाची पेरणी वेळेत केली मात्र पावसाने सुरुवातीपासूनच दांडी मारल्याने पिके करपून गेली. बियाणे,खते,औषधे,मशागत व पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च पिकातून एक रुपयाही हातात न पडता वाया गेला आहे. आता शेतात उभे पीक नसून केवळ करपलेले अवशेष आणि दुष्काळाची भयावहता दिसत आहे.



              पंचनाम्यात काय दाखवायचे? शेतकऱ्यांचा सवाल रब्बी हंगामात पाऊस पडेल आणि कदाचित पुढील पीक घेता येईल,या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी करपलेल्या खरीप पिकांची फणपाळी करून शेत तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पंचनामे करणाऱ्या यंत्रणेने केवळ शेतात सध्या काय दिसते यावर आधारित नोंद न करता पिकाची पेरणी झालेला खर्च पावसाची स्थिती आणि प्रत्यक्ष नुकसान याची वस्तुनिष्ठ पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.पिके करपून गेल्यानंतर रब्बीच्या आशेने शेताची फणपाळी केली आता पंचनामा करताना आम्ही काय दाखवायचे? आमच्या शेताची प्रत्यक्ष अवस्था पाहूनच पंचनामा करा अशी व्यथा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.



            दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, पंचनाम्याच्या नोंदीत प्रत्यक्ष नुकसान प्रतिबिंबित झाले नाही तर दुष्काळाची मदत कागदावरच राहण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमांच्या चौकटीसोबतच जमिनीवरील वस्तुस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.यावेळी उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी,तहसीलदार मदन जाधव,तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ,पाटखळच्या तलाठी अर्चना लोखडे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

दुष्काळ कागदावर नाही, शेतात दिसतोय! शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी दुष्काळाची खरी तीव्रता शेताच्या बांधावर जाऊनच समोर येते.करपलेली पिके,वाया गेलेला उत्पादन खर्च आणि रब्बीच्या पावसाकडे लागलेले शेतकऱ्यांचे डोळे ही दक्षिण मंगळवेढ्याची आजची भयावह वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पंचनामे करताना कागदी नोंदींपेक्षा प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीला प्राधान्य देण्याची गरज या पाहणी दौऱ्यातून अधोरेखित करण्याची गरज असल्याची शेतकऱ्यांना मधून बोलले जात आहे.

Pages